तेनाली रामन
थट्टेचा परवाना
तेनालीरामची काळजी
तेनालीराम राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात विदूषक होता. त्याच्या थट्टेचा राजाला अनेकदा राग येई. राजगुरूंनाही राग येई. एके दिवशी तेनालीरामला एक काळजी लागली. “मी कितीही हुशार असलो,” तो मनात म्हणाला, “तरी माझ्या थट्टेने त्या दोघांचा पारा चढतो. एखाद्या दिवशी भलत्याच संकटात सापडायचो. जीवही गमावून बसायचो. तेव्हा सुटकेचा मार्ग आधीच तयार ठेवलेला बरा.” म्हणून तेनालीराम राजगुरूंकडे गेला. काही दिवस तो त्यांचा परम भक्त असल्याचे सोंग करत राहिला. शेवटी राजगुरूंचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.
थट्टेचा परवाना
जिच्यासारखी दुसरी नाही
मग त्याने राजगुरूंना एक गोष्ट सांगितली. “उत्तरेकडून एक नवरा-बायको आले आहेत. ते माझ्या घरी उतरले आहेत. तिच्या सौंदर्याचे काय वर्णन करू? तिच्यासारखी स्त्री कुठल्याही देशात असेल, असे मला वाटत नाही.” “माझी तिच्याशी ओळख करून देण्याचा काही मार्ग काढशील का?” राजगुरूंनी विचारले. “ते फार कठीण आहे,” तेनालीराम म्हणाला. “तिचा नवरा तिला सोडून क्षणभरही कुठे जात नाही. पण आपण स्त्रीचा वेष करून आज रात्री अमुक वेळी माझ्या घरी या. मग मी आपली तिची भेट घडवून आणीन. तिच्या नवऱ्याला संशयसुद्धा येणार नाही.”
थट्टेचा परवाना
तीच गोष्ट दुसऱ्यांदा
मग तेनालीराम राजाकडे गेला. आपल्या घरच्या त्या सुंदर स्त्रीची तीच गोष्ट त्याने राजालाही अगदी तशीच सांगितली. “मग अशी स्त्री माझी झालीच पाहिजे,” राजा म्हणाला. “निदान एकदा तरी.” “मग महाराज, आज रात्री आपण स्त्रीच्या वेषात माझ्या घरी यावे, हे बरे,” तेनालीराम म्हणाला. राजगुरूंना दिलेल्या वेळेनंतरची वेळ त्याने राजाला सांगितली. “तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवीन.” त्या रात्री राजगुरू त्यांना दिलेल्या वेळी आले. तेनालीरामने एका खोलीत एक खाट आणि उशी मांडली. आणि राजगुरूंना तिथे झोपायला सांगितले.
थट्टेचा परवाना
बाहेरून कडी
नंतर राजा आला. तेनालीराम त्याला त्याच खोलीपाशी घेऊन गेला. “मी सांगितलेली स्त्री या खोलीत आहे,” तो म्हणाला. “आपण आत जावे.” राजा पुरता आत जाताच तेनालीरामने दार ओढून बाहेरून कडी लावली. आत प्रत्येकाला वाटले, की दुसरा म्हणजे तीच सुंदर स्त्री. दोघेही एकमेकांशी लगट करू लागले. मग राजाने पाहिले, हे तर आपले राजगुरू! राजगुरूंनी पाहिले, हा तर राजा! दोघेही शरमेने पाणी पाणी झाले.
थट्टेचा परवाना
दिवसाला शंभर
दोघेही तेनालीरामवर भयंकर चिडले. “दार उघड,” ते त्याला म्हणाले. पण बराच वेळ तो दार उघडेना. शेवटी ते गोड बोलू लागले. त्याच्या विनवण्या करू लागले. तेव्हा तेनालीराम दोघांना म्हणाला, “आजपासून माझ्या हातून आपल्यापैकी एकाचा किंवा दोघांचाही अपराध घडला, तरी आपण मला माफ करायचे. दिवसाला शंभर अपराधांपर्यंत माफी. अशी देवाची शपथ घ्या. मग मी दार उघडतो.” दोघांनीही गंभीरपणे तशी शपथ घेतली. मग तेनालीरामने दार उघडले. आणि पुन्हा पुन्हा क्षमा मागत त्यांना निरोप दिला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या सहाव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.