तेनाली रामन
तीनदा मरता मरता वाचला
हत्तीच्या पायाखाली
तेनालीराम राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात विदूषक होता. कधी कधी त्याची थट्टा मर्यादा ओलांडे. मग राजाला राग येई. अशा थट्टेपायी तीन वेळा तर त्याचा जीव जाता जाता राहिला. पहिल्या वेळी राजा इतका संतापला, की त्याने तेनालीरामला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्याची शिक्षा दिली. राजवाड्यातले नोकर तेनालीरामला शहराबाहेर एका मोकळ्या माळावर घेऊन गेले. तिथे त्यांनी एक खोल खड्डा खणला. त्यात त्याला पुरले. फक्त तोंड तेवढे जमिनीच्या वर राहू दिले. मग त्याच्या डोक्यावर पाय देणारा हत्ती आणायला ते शहरात परत गेले.
तीनदा मरता मरता वाचला
कुबडा परीट
ते गेले असताना तिथून एक परीट चालला होता. त्याच्या पाठीला कुबड होते. “अहो,” त्याने विचारले, “तुम्हाला असे का पुरले आहे?” “कित्येक वर्षे माझ्या पाठीला वाईट कुबड होते,” तेनालीराम म्हणाला. “अंग सरळ व्हावे, म्हणून एका वैद्याने मला इथे पुरले. आता बाक गेला, मी सरळ झालो. मला बाहेर काढ आणि स्वतःच बघ.” परटाने त्याला खणून बाहेर काढले. त्याने तेनालीरामला निरखून पाहिले. कुठेही बाक दिसेना. मग तो विनवू लागला, “मलाही या खड्ड्यात पुरा. माझी पाठही अशीच सरळ होऊ द्या.”
तीनदा मरता मरता वाचला
एक भला परीट
तेनालीरामने आनंदाने त्याची इच्छा पुरी केली. त्याने परटाला खड्ड्यात पुरले. त्याचे गाठोडे उचलले. आणि तो राजवाड्यात परत आला. “हे काय?” राजा ओरडला. “तेनालीराम, तू इथे? तुला हत्तीच्या पायाखाली तुडवायची आज्ञा मी दिली नव्हती का?” तेनालीरामने शांतपणे लवून नमस्कार केला. “दिली होती, महाराज,” तो म्हणाला. “पण एका भल्या परटाने मोठ्या मनाने माझी जागा घेतली. आणि हे गाठोडे माझ्याकडे ठेवले.” मग तो खड्ड्यातून कसा सुटला, ते त्याने राजाला सांगितले. राजा खो खो हसला. आणि त्याने आपल्या विदूषकाला माफ केले.
तीनदा मरता मरता वाचला
दोन तलवारी
आणखी एकदा तेनालीरामची एक थट्टा भलतीच अंगाशी आली. राजा पुन्हा भडकला. त्याने दोन शिपायांना बोलावले आणि विदूषकाला त्यांच्या ताब्यात दिले. “या बदमाशाला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा,” तो म्हणाला. “आणि तलवारीने याचे डोके उडवा.” शिपाई त्याला घेऊन गेले. ते तयारी करू लागले, तेव्हा तेनालीराम त्यांच्याशी हळुवारपणे बोलला. “माझे डोके तर तुम्हाला उडवायचेच आहे,” तो म्हणाला. “पण परलोकी माझ्या जिवाचे भले व्हावे, म्हणून आधी थोडा वेळ देवाची प्रार्थना करू द्या. त्या समोरच्या तळ्यात गळाभर पाण्यात उभा राहू द्या.”
तीनदा मरता मरता वाचला
गळाभर पाण्यात
“तुम्ही दोघे तलवारी उपसून माझ्या दोन्ही बाजूंना उभे राहा,” तेनालीराम पुढे म्हणाला. “माझी प्रार्थना संपली, की दोघांनी एकाच क्षणी घाव घाला. एकाच सणसणीत घावात माझे डोके उडवा.” शिपायांनी ते मान्य केले. तेनालीराम तळ्यात उतरला. गळ्यापर्यंत पाण्यात उभा राहिला. प्रार्थना संपली. शिपायांनी दोन्ही बाजूंनी एकाच वेळी त्याच्या मानेवर तलवारी चालवल्या. त्याच क्षणी तेनालीरामने पाण्यात बुडी मारली. त्याची मान होती तिथे आता फक्त हवा होती. प्रत्येकाची तलवार त्या रिकाम्या जागेतून सपकन गेली. आणि तिने पलीकडच्या शिपायाचे डोके उडवले. तेनालीरामने एक क्षणही दवडला नाही. तो सरळ परत जाऊन राजासमोर उभा राहिला. राजा थक्क झाला. त्याने प्रश्नांवर प्रश्न विचारले. तेनालीरामने एकच छोटे उत्तर दिले. “वेंधळे कुठले!” तो म्हणाला. “एकमेकांनाच मारून बसले, आणि मला निसटू दिले.”
तीनदा मरता मरता वाचला
डोके दाखवू नकोस
तिसऱ्यांदा तेनालीरामची थट्टा पुन्हा मर्यादा ओलांडून गेली. “दुष्टा!” राजा रागाने म्हणाला. “तुझे ते नकोसे डोके पुन्हा इथे दाखवलेस, तर ते धडावेगळे होईल!” तेनालीराम लगेच दरबारातून निघून गेला. पण थोड्याच वेळात तो परत आला. डोक्यावर त्याने रुंद तोंडाचे पाण्याचे एक मोठे मडके घातले होते. त्यात त्याचे डोके पुरते झाकले गेले होते. सगळा दरबार खो खो हसू लागला. आणि मडक्याच्या आतून आवाज आला, तेव्हा राजाही त्यांच्याबरोबर हसला: “महाराज, माझे हे नकोसे डोके आता आपल्या डोळ्यांत खुपत तर नाही ना?” पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टींवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.