विक्रम वेताळ
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
कवींना तुच्छ लेखणारी सुंदरी
वेताळ पुन्हा विक्रमाच्या पाठीवरच्या कापडात होता, आणि त्याचा मुलगा धर्मध्वज त्याच्याबरोबर चालत होता. “हे राजा विक्रमा,” वेताळ म्हणाला, “पुढची कथा विलक्षण मनोरंजक आहे.” हरिदास ब्राह्मणाची सुंदर मुलगी उन्मादिनी हिची कीर्ती साऱ्या आर्यावर्तात दूरदूर पसरली होती. शंभर पंडित आणि कवी काव्यांतून आणि पदांतून तिच्या सौंदर्याचे गोडवे गात. पण सगळ्यांच्या त्याच त्याच घासून गुळगुळीत झालेल्या उपमा: तिचा चेहरा म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, डोळे हरिणीचे. पण हे राजा विक्रमा, एकाही कवीला तिचे प्रेम जिंकता आले नाही. सुंदरीच्या सौंदर्याची स्तुती करणे म्हणजे तिची स्तुती नव्हे. तिच्या बुद्धीची आणि गुणांची स्तुती कर, म्हणजे कदाचित यश मिळेल. खुशामत, तुला ठाऊकच आहे, हीच प्रेमाची ज्योत पेटवणारी काडी असते. अर्थात, काही पुरुष रांगड्या वागण्याने आणि फटकळ बोलण्यानेही बाजी मारतात. हे बोलणे वडिलांच्या कानांना कसे लागत असेल, या कल्पनेने राजपुत्र धर्मध्वजाला इथे हसू आवरले नाही. राजाने वेताळाला कडक शब्दांत दटावले, हे अनीतीचे बोलणे बंद कर आणि कथा पुढे सांग. म्हणून उन्मादिनीला कवी आणि साहित्यिक यांचा तिटकारा आला. तिचे वडील तिच्यावर जिवापाड प्रेम करीत. त्यांना तिने सांगितले, माझा नवरा कधीही कविता न करणारा देखणा तरुण असावा, आणि बुद्धिमान, विद्वानही असावा. ती इतकी चांगली स्थळे नाकारते आहे हे पाहून तिच्या मैत्रिणींनी भाकीत केले, की शेवटी हिला एखाद्या टाकाऊ स्थळावरच समाधान मानावे लागेल.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
चार वर
अखेर चार वेगवेगळ्या देशांतून चार वर आले. तारुण्याने आणि रूपाने, बळाने आणि बुद्धीने चौघेही सारखे होते. हरिदासाने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर यायला सांगितले. पहिली परीक्षा विद्वत्तापूर्ण संभाषणाची होती. पहिला, महाशनी नावाचा तरुण कवी, म्हणाला, “केळीच्या खुंटासारख्या दुबळ्या आणि सागरावरच्या फेसासारख्या क्षणभंगुर या जगात जो काही चिरस्थायी शोधतो, तो मूर्ख. मेलेल्यांसाठी आक्रोश करू नका; त्यांचे अंत्यसंस्कार मात्र काळजीपूर्वक करा.” पडद्यामागे बसलेली उन्मादिनी म्हणाली, “हा कोण अपशकुनी माणूस? शिवाय याने कविता म्हणून दाखवायचे धाडस केले!” या वराची डाळ शिजण्याची शक्यता कमीच होती. दुसरा म्हणाला, “आईवडिलांनी ज्याच्या हाती तिला सोपवले, त्या पुरुषाची सद्गुणी स्त्री सेवा करते. पती जिवंत असताना जी पत्नी व्रतस्थ होऊन उपवास करते, ती त्याचे आयुष्य कमी करते, असे शास्त्र सांगते.” “सेवा” हा शब्द तिच्या कानांना खुपला, आणि तिच्या व्रतवैकल्यांना इतक्या लवकर आडकाठी आलेली तिला नको होती. याचे तोंड पुन्हा कधी पाहायचे नाही, असे तिने ठरवले, आणि हा हत्तीसारखाच मठ्ठ, असा त्याच्याबद्दल निवाडा दिला. “आई मुलाचे लहानपणी रक्षण करते,” तिसरा, गुणाकर, म्हणाला, “आणि वडील तो मोठा होत असताना. पण क्षत्रिय पुरुष आपल्या भावांचे सदैव रक्षण करतो. माझी स्थिती अशी आहे. बलवानांच्या मस्तकांवर माझा निवास असतो!” तिथे जमलेले सगळे त्या पराक्रमी पुरुषाकडे मोठ्या आदराने पाहू लागले. चौथा, देवशर्मा, फक्त ऐकत राहिला. त्याची पाळी आली, तेव्हा तो एवढेच म्हणाला, “बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ.” पहिल्या दोघांना हरिदासाने गोड शब्दांत आणि लहानशा भेटी देऊन निरोप दिला, आणि उरलेल्या दोघांना दुसऱ्या दिवशी पुन्हा यायला सांगितले.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
अनुत्तरित प्रश्न
गुणाकर आणि देवशर्मा आले. वडील म्हणाले, “तुमच्या विद्येची फळे मला दाखवा, म्हणजे मला त्यांची पारख करता येईल.” गुणाकर म्हणाला, “मी चार चाकांचा एक रथ बनवला आहे. आपण जिथे जायचे म्हणाल, तिथे तो आपल्याला क्षणात नेऊन पोहोचवेल.” देवशर्मा म्हणाला, “मृत्युदेवतेवर माझी इतकी सत्ता आहे, की मी केव्हाही प्रेत उठवू शकतो, आणि माझ्या मित्रांनाही ते सामर्थ्य देऊ शकतो.” आता, हे वीर राजा विक्रमा, तुझी अक्कल चालवून सांग: या दोघांपैकी त्या कन्येला अधिक योग्य पती कोण? राजाला उत्तर देता आले नाही, किंवा कदाचित त्याने ते दिले नाही. ज्या चक्रामुळे इतके तास त्याला येरझारा घालाव्या लागत होत्या, ते तोडायचा त्याचा निर्धार होता. राजेशाही वाहकाने तोंड उघडून अडकावे, म्हणून वेताळ जरा थांबला होता. पण सापळा फुकट गेला, हे पाहून तो पुढे सांगू लागला. उन्मादिनीला बाहेर आणले. तिने मान खाली घातली, ती काही बोलली नाही; पण आपले दोन्ही डोळे देवशर्म्याकडे वळतील, याची तिने पुरेपूर काळजी घेतली. “मोती मोत्यांबरोबरच ओवावेत” ही म्हण सांगून हरिदासाने देवशर्म्याशी तिचा वाङ्निश्चय केला. योद्धा गुणाकर मिशांना पीळ भरू लागला, संतापाने त्याचे डोळे लाल झाले, आणि त्याचा हात तलवारीच्या मुठीशी चाळा करू लागला. पण तो कुलीन होता, आणि त्याचा राग लवकरच निवळला.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
कवीचा सूड
पण कवी महाशनी निर्लज्ज होता. तो जबरदस्तीने सभेत घुसला आणि आरडाओरडा, थयथयाट करू लागला. स्त्रिया म्हणजे दुःखाची खाण आणि विषाचे मूळ, असे तो म्हणाला. मुलीवरून तो बापावर घसरला, आणि बापावरून सगळ्या भटजींवर आणि भटजींच्या पोरांवर, विशेषतः देवशर्म्यावर. जमलेल्या लोकांनी आक्षेप घेतला, तसा तो अधिकच चेकाळला. हरिदास दुबळा माणूस होता; तो त्याला उघडउघड घाबरला होता. मग महाशनीने गंभीर शपथ घेतली: वाङ्निश्चय झाला असो वा नसो, उन्मादिनी माझी बायको झाली नाही, तर मी जीव देईन, आणि राक्षस होऊन हे घर झपाटीन आणि इथे राहणाऱ्या सगळ्यांचा छळ करीन. योद्धा गुणाकर त्याला म्हणाला, मग आत्ताच जीव दे आणि हवे तिथे जा. हरिदासाने त्या योद्ध्याला त्याच्या निष्ठुरपणाबद्दल दटावले. पण द्वेष, प्रेम, संताप आणि हटवादीपणा यांच्या भरात महाशनीने छातीपाशी ठेवलेला एक फास काढला, घराबाहेर धाव घेतली आणि जवळच्याच झाडाला गळफास लावून घेतला. आणि झालेही तसेच. मध्यरात्रीचा घंटानाद होताच तो एका प्रचंड, दुष्ट, नरभक्षक राक्षसाच्या रूपात प्रकट झाला. त्याने हरिदासाच्या घरच्या माणसांची घाबरगुंडी उडवली आणि उन्मादिनीला उचलून नेले. ती हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर सापडेल, असा निरोप त्याने मागे ठेवला.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
उडता रथ
दुःखी बाप रडत, आकांत करीत देवशर्म्याच्या घरी धावला, आणि माझ्या मुलीला वाचवा, अशी त्याने भावी जावयाची विनवणी केली. तरुण ब्राह्मण तात्काळ आपल्या आधीच्या प्रतिस्पर्ध्याकडे गेला आणि त्याने त्याची मदत मागितली. एका पोरसवदा भटजीकडून प्रेमात हार खावी लागली, याचे शल्य योद्ध्याच्या मनात होते; तरीही त्याने लगेच मदत केली. तुम्ही निश्चिंत राहा, सूर्य मावळण्यापूर्वी मुलगी तुमच्या कुशीत असेल, असे वडिलांना सांगून ते रथात बसून निघाले. गुणाकराने गूढ मंत्राक्षरे म्हणून रथ उंच आकाशात उडवला, आणि देवशर्म्याने सूर्याचा पवित्र मंत्र म्हणून राक्षसाला पळवून लावले. त्यांनी मुलीला घरी आणले. हरिदासाने त्यांना आशीर्वाद दिले आणि आनंदाने मोठ्याने सूर्याचे स्तवन केले. आणखी काही विघ्न येऊ नये म्हणून त्याने ग्रहयोग पाहून शुभ मुहूर्त काढला आणि लग्न लावून दिले. लग्न मोठ्या थाटाचे झाले, आणि त्यामुळे चोवीस प्रतिस्पर्ध्यांची हृदये भंगली. यथाकाळ देवशर्मा नववधूला घेऊन स्वतःच्या घरी निघाला. योद्धा गुणाकर त्यांच्याबरोबर गेला. या जोडप्याला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याशिवाय त्यांची साथ सोडणार नाही, अशी त्याने शपथ घेतली.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
धागा आणि मंत्र
त्यांचा रस्ता विंध्य पर्वताच्या रानटी डोंगरांतून जात होता. वाटेत कडेकपारी, खळाळते ओढे, दाट जंगल आणि वादळे होती; हत्ती, वाघ आणि तरसही होते. प्रत्येक संकटातून ते सुखरूप पार झाले. डोंगरांखालच्या सपाट प्रदेशात ते जवळजवळ उतरले होते, तेव्हा एका रात्री उन्मादिनीला एक भयंकर स्वप्न पडले. ती चिखलाच्या डबक्यातून वाट काढत चालली होती. सभोवती मुले आकांत करीत होती, आणि जणू तीच त्यांच्या रडण्याचे कारण असावी, तशी ती मुले तिला हाका मारीत होती. जागी झाल्यावर तिने ते स्वप्न नवऱ्याला सांगितले. तो म्हणाला, आपल्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्याने प्रवासाच्या झोळीतून धाग्याची एक लड काढली आणि तिचे तीन भाग करून प्रत्येकाला एक दिला. कोणी गंभीर जखमी झाले, तर या धाग्याचा तुकडा जखमेभोवती गुंडाळताच जखम लगेच भरून येईल, असे त्याने सांगितले. मग त्याने त्यांना तो मंत्र शिकवला, ज्याच्या गूढ शब्दांनी माणसांचे प्राण, ते ताऱ्यांत जाऊन बसले तरी, पुन्हा देहात आणता येतात. उघड कारणांसाठी तो मंत्र मी इथे म्हणून दाखवणार नाही. पण त्याचा शेवट तीन पवित्र अक्षरांनी होतो: भूः, भुवः, स्वः! हे ऐकून राजा विक्रम कदाचित थोडा निराश झाला असेल, पण तो काही बोलला नाही.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
किरात
देवशर्म्याने भाकीत केल्याप्रमाणे खरोखरच एक भयंकर घटना घडली. त्याच संध्याकाळी ते सपाट प्रदेशात उतरत असताना डोंगरातल्या रानटी किरात जमातींनी त्यांच्यावर हल्ला केला. धनुष्य आणि वेताचे बारीक बाण घेतलेला एक लहानखुरा, काळा, काटक माणूस त्यांची वाट अडवून उभा राहिला, आणि थांबा, शस्त्रे खाली ठेवा, अशी त्याने खूण केली. ते तसेच पुढे चालत राहिले, तेव्हा घाबरलेल्या पक्ष्यासारखा तो किनऱ्या आवाजात कलकलाट करू लागला आणि हातातले शस्त्र डोक्याभोवती गरगर फिरवू लागला. मग वाटेच्या दोन्ही बाजूंच्या खडकांतून आणि झुडपांतून त्या तिघा परक्यांवर बाणांचा वर्षाव झाला. ही विषम लढाई फार वेळ टिकली नाही. योद्धा गुणाकराने आपल्या बलदंड उजव्या हाताने साठेक शत्रूंना लोळवले. पण ज्याने पोळे फोडले त्या माणसाभोवती चवताळलेल्या गांधीलमाश्या घोंगावतात, तसे नवे नवे थवे येतच राहिले. पत्नीला एका झाडाच्या ढोलीत लपवण्यासाठी देवशर्मा क्षणभर त्याला सोडून गेला होता. गुणाकर पडला, तेव्हा देवशर्मा परत आला आणि मित्राच्या देहाचे रक्षण करीत लढत राहिला. अखेर त्यालाही शत्रूंनी जेरीस आणून खाली पाडले. मग त्या रानटी लोकांनी सुरे काढले आणि असहाय शत्रूंची मुंडकी उडवली. देहांवरचे सारे दागिने ओरबाडून ते निघून गेले. स्त्रीला मात्र, शुभशकुन म्हणून, त्यांनी धक्का लावला नाही.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
चुकलेली मस्तके
लढाई चालू असताना उन्मादिनी अर्धमेली झाली होती. किंकाळ्या आणि आरोळ्या थांबून सारे शांत झाले, तेव्हा ती ढोलीतून हळूच बाहेर आली. समोर तिचा नवरा आणि त्याचा मित्र पडले होते, आणि त्यांची मुंडकी धडांपासून थोड्या अंतरावर पडली होती. ती खाली बसली आणि धाय मोकलून रडली. मग तिला त्याच दिवशी सकाळी मिळालेला धडा आठवला. तिने उराशी ठेवलेला धाग्याचा तुकडा काढला, मुंडकी धडांना लावली, आणि प्रत्येकाच्या मानेभोवती तो जादूचा धागा गुंडाळला. पण दिवस झपाट्याने मावळत होता, आणि भीतीच्या आणि गोंधळाच्या भरात तिने प्रत्येकाचे मस्तक दुसऱ्याच्या धडावर बसवले. मग तिने प्रार्थना केली आणि नवऱ्याने शिकवल्याप्रमाणे संजीवन मंत्र उच्चारला. क्षणात ते मेलेले जिवंत झाले. त्यांनी डोळे उघडले, उठून बसले आणि आपापले हातपाय चाचपून पाहिले. मग त्यांनी कपाळाला तळहात लावले, खाली पाहिले, ताडकन उठून उभे राहिले, आणि स्वतःच्या हातांकडे, पायांकडे, आणि अखेर एकमेकांकडे टक लावून पाहू लागले. ते केवळ भांबावले आहेत, असे पत्नीला वाटले; नुकतीच मुंडकी उडालेल्या माणसांनी भांबावणे साहजिकच होते. आनंदाने चीत्कार करीत, ज्याला ती नवरा समजली त्याच्याकडे ती धावली. त्याने तिला दूर लोटले आणि सांगितले, तुझी चूक होते आहे. लाजेने लालेलाल होऊन तिने दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकले; खरा नवरा हाच असला पाहिजे. पण तोही मागे सरला. मग एक भयानक विचार तिच्या मनात चमकून गेला. आपली घातक चूक तिच्या लक्षात आली, आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
कोणाची पत्नी?
“ही तुझी पत्नी आहे!” योद्ध्याच्या धडावर बसवलेले देवशर्म्याचे मस्तक ओरडले. “नाही, ती तुझी पत्नी आहे!” ब्राह्मणाच्या धडावरचे योद्ध्याचे मस्तक म्हणाले. “तर मग ती माझी पत्नी!” पहिला म्हणाला. “मुळीच नाही! ती माझी पत्नी!” दुसरा ओरडला. “मग मी कोण?” देवशर्मा-गुणाकराने विचारले. “आणि मी कोण, असे तुला वाटते?” गुणाकर-देवशर्म्याने उलट विचारले. “उन्मादिनी माझीच होईल,” मस्तक म्हणाले. “खोटे बोलतोस, ती माझी होईल,” धड ओरडले. “हे पवित्र यमदेवा, या दुष्टाचे बोलणे ऐक!” दोघेही एकदम ओरडले. असे ते तावातावाने भांडत राहिले; उन्मादिनी माझी, फक्त माझी, असे प्रत्येकजण म्हणत होता. हा वाद कसा मिटवायचा, ते सृष्टिकर्ता ब्रह्मदेवच जाणे. मला तर कळत नाही; त्यांची मुंडकी पुन्हा उडवून योग्य जागी बसवली, तर गोष्ट वेगळी. आणि हे राजा विक्रमा, या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुझी अक्कल अपुरी आहे, याची मला पक्की खात्री आहे. प्रश्न असा: सुंदर उन्मादिनी कोणाची पत्नी? गुणाकराच्या धडावर देवशर्म्याचे मस्तक असलेल्या पुरुषाची, की देवशर्म्याच्या धडावर गुणाकराचे मस्तक असलेल्या पुरुषाची? आम्हा वेताळांमध्ये असे म्हणतात, की ही अर्ध्या-अर्ध्या नवऱ्यांची जोडी न्यायी राजा यमधर्माच्या पुढे गेली, तेव्हा भयंकर गोंधळ उडाला. प्रत्येक मस्तक आपल्या धडाने केलेली सारी पापे घडाघडा सांगू लागले, आणि खुद्द यमाने वैतागून स्वतःची तर्जनी चावली.
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
सर्वश्रेष्ठ अंग
अदलाबदल झालेल्या मस्तकांची कल्पना ऐकून राजपुत्र धर्मध्वज खो खो हसू लागला. मुलगा माझी थट्टा तर करीत नाही ना, असा संशय विक्रमाला नेहमीच येत असे. त्याने मुलाला कडक शब्दांत फटकारले: विनाकारण हसणे माणसाला चार लोकांच्या नजरेत हलके करते, आणि मोठ्याने खिदळणे हे रिकाम्या डोक्याचे लक्षण. मग मोठ्या थाटात त्याने आपले मत दिले. “शास्त्रांत असे सांगितले आहे—” “महाराजांनी एवढे पांडित्य मिरवायची काही गरज नाही!” वेताळ उद्धटपणे मध्येच म्हणाला. “हे नक्कीच नवरत्नांपैकी कोणाकडून तरी आले असणार. महाराजांच्या दरबारातल्या त्या विद्वानांना शास्त्रांपेक्षा गाणी आणि कवनेच अधिक कळतात.” वेताळाला चांगला चोप द्यावा की काय, असा विचार राजाच्या मनात आला. मग तो कठोरपणे पुढे म्हणाला, “शास्त्रांत असे सांगितले आहे, की गंगामाई नद्यांची राणी, सुमेरू पर्वतांचा राजा आणि कल्पवृक्ष वृक्षांचा राजा. त्याचप्रमाणे माणसाच्या अवयवांमध्ये मस्तक हेच सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम अंग. म्हणून पत्नी त्या पुरुषाची, ज्याचे सर्वश्रेष्ठ अंग तिच्या पतीचे आहे; म्हणजे जो देवशर्म्याचे मस्तक धारण करतो, त्याची.”
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
पोटातला आत्मा
“माझ्या मते,” वेताळ हसत म्हणाला, “शास्त्रांच्या विरुद्ध आणि राजा विक्रमाच्याही विरुद्ध, सुंदर उन्मादिनी मस्तकाची नव्हे, तर धडाची होती. कारण माणसाचा अमर आत्मा पोटाच्या खळग्यात राहतो. मस्तक म्हणजे कमी-जास्त जाड हाडांची एक पेटी, आणि तिच्यात भरलेला मेंदू वासराच्या मेंदूसारखाच.” “अधमा!” राजा ओरडला. “आत्मा टाळूवरच्या ब्रह्मरंध्रातून देहात प्रवेश करतो, मेंदूत राहतो, आणि त्याच वाटेने परमेश्वराच्या दिव्य गुणांचे ध्यान करतो, असे नाही का?” “हे वीर राजा विक्रमादित्या, शकाधिपती, आता थोडा वेळ मला तुझा निरोप घ्यायला हवा! या अवघडलेल्या स्थितीतून सुटून माझ्या स्वभावाला अधिक साजेशा स्थितीत जावे, अशी एकाएकी इच्छा झाली आहे.” विक्रम बोलला होता, त्यामुळे वेताळाला उडून जाण्यापासून तो रोखू शकला नाही. पण गाईच्या शिंगावर पडलेला मोहरीचा दाणा जितका वेळ टिकतो, तितकाही वेळ त्याने त्याच्या मागे जायला दवडला नाही. आणि त्याला खांद्यावर टाकल्यावर, स्वतःहूनच त्याने त्याला नवी कथा सुरू करायला सांगितले. “अरेरे, माझी डावी पापणी लवते आहे,” वेताळ हताश होऊन ओरडला. “छाती धडधडते आहे, डोळ्यांपुढे अंधारी येते आहे. आता नक्कीच शेवटाला सुरुवात झाली. विधात्याने माझ्या कपाळी लिहिले आहे, तसेच होणार; त्यात बदल कसा होईल? तरीही, हे महाप्रतापी राजा, मी तुला एक खरी कथा सांगतो, ती ऐक. सरस्वती माझ्या जिभेवर येऊन बसो.”
वेताळाची नववी कथा — पत्नी देहाची नव्हे, मस्तकाची
आधार
रिचर्ड एफ. बर्टन यांच्या “विक्रम अँड द व्हॅम्पायर” (१८७०) या पुस्तकातील वेताळाच्या नवव्या कथेवरून ही कथा पुन्हा सांगितली आहे. सोमदेवाच्या कथासरित्सागरात ही वेताळाची सहावी कथा आहे, आणि वर, राक्षस आणि उडता रथ यांचे प्रसंग पाचव्या कथेची आठवण करून देतात. कवींनी केलेली स्तुती आणि खुशामतीवरचे वेताळाचे बोलणे, वरांची भाषणे, विंध्य पर्वत, उन्मादिनीचे स्वप्न आणि आत्म्याविषयीचे वेताळाचे बोलणे संक्षेपाने दिले आहेत.