भीष्मांचा उपदेश · अंतिम उपदेश
थोरला भाऊ
ज्येष्ठः कुलं वर्धयति विनाशयति वा पुनः । हन्ति सर्वमपि ज्येष्ठः कुलं यत्रावजायते ॥
थोरल्या भावाने धाकट्या भावांशी कसे वागावे, आणि त्यांनी त्याच्याशी कसे, असे युधिष्ठिर विचारतो. युधिष्ठिर पाच भावांत थोरला आहे, आणि भीष्म त्याला थोरला भाऊ म्हणूनच उत्तर देतात. चांगला गुरू शिष्यांशी वागतो, तसे भावांशी वाग, ते सांगतात; गुरूपेक्षा शिष्य चांगला निघू शकत नाही. थोरल्याने कधी कधी धाकट्यांच्या कृत्यांकडे डोळेझाक करावी, आणि आपल्याला काही कळलेच नाही असे दाखवावे. त्यांनी चूक केली, तर आडवळणाने त्यांना सुधारावे. उघडपणे सुधारायला गेले, तर भावाभावांतले ऐक्य पाहून दुःखी होणारे शत्रू त्यांच्यात फूट पाडायला टपतात. “थोरला भाऊ कुळाची भरभराट करतो, किंवा त्याचा नाश करतो.” तो अविचारी आणि दुष्ट निघाला, तर सारे कुळ बुडवतो. धाकट्या भावांवर अन्याय करणारा थोरला भाऊ थोरला उरत नाही: कुळाच्या संपत्तीतला त्याचा वाटा जातो, आणि राजाने त्याला आवर घालावा. थोरला भाऊ बरा वागो वा वाईट, त्याचा अनादर करू नये. पत्नी किंवा धाकटा भाऊ चुकला, तरी त्यांचे हित पाहिलेच पाहिजे. वडील गेले, की थोरला भाऊ त्यांची जागा घेतो. तो इतरांचा उदरनिर्वाह चालवतो, आणि त्यांचे रक्षण करतो; ते त्याला नमस्कार करतात, आणि वडिलांच्या छत्राखाली राहिले तसेच त्याच्या छत्राखाली राहतात. वडील दहा गुरूंच्या बरोबरीचे, भीष्म पुढे सांगतात, आणि आई दहा वडिलांच्या, किंवा संपूर्ण पृथ्वीच्या: तिच्या तोडीचे कोणी वडीलधारे नाही. थोरली बहीण आईसमान. थोरल्या भावाची पत्नीही तशीच; तिने कदाचित धाकट्या दिराला तान्हेपणी अंगावरही पाजले असेल. अनुशासनपर्व १०५.६.