बहिणाबाईंची गाणी
खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला!
सुगरण हा खानदेशातल्या प्रत्येक शेतकरी पोराच्या ओळखीचा पक्षी. त्याच्यापासून बहिणाबाई गाण्याची सुरुवात करतात. झाडांवरच्या सगळ्या खोप्यांमध्ये (घरट्यांमध्ये) सुगरणीचा खोपा सगळ्यात चांगला, असं त्या म्हणतात. बघा, आपल्या पिलांसाठी तिने फांदीला झोकाच टांगला आहे. सुगरण गवताच्या बारीक पट्ट्या गुंफून खोपा विणते. तो ती बारीक फांदीच्या टोकाला टांगते, बहुधा विहिरीवर झुकलेल्या बाभळीला. तिथे साप-मांजर पोहोचू शकत नाही. वारा आला की खोपा झोक्यासारखा झुलतो. आत पिलं जणू झुलत्या बंगल्यात झोपली आहेत. घर त्यांचं स्वतःचं, ऐसपैस, आणि वर झुलणारं! आईचा जीव त्या पिलांत गुंतलेला असतो. म्हणून बहिणाबाई म्हणतात, खरं तर तिचा स्वतःचा जीवच त्या झाडाला टांगलेला आहे.
खोप्यामधी खोपा
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जल्माचा संगाती मिये गन्यागंप्या नर
मग बहिणाबाई हसतात. ही सुगरण, माझी सुगरण किती चतुर, असं कौतुक करतात. आणि पुढच्याच ओळीत चिमटा काढतात: एवढ्या हुशार पक्षिणीला जन्माचा जोडीदार मिळाला तो मात्र गन्यागंप्या (भोळसट, बावळा) नर! गावातल्या बायकांनी एकमेकींना डोळा मारून सांगावा, असा हा विनोद आहे. घर बांधते ती, पिलं सांभाळते ती; आणि नशिबाने पदरात टाकलेला नवरा मात्र बावळट.
खोप्यामधी खोपा
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा! तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं?
आता बहिणाबाई पक्ष्याकडून आपल्याकडे वळतात. बघा हा खोपा कसा विणून विणून केलाय, त्या म्हणतात; अगदी गिलक्याच्या (घोसाळ्याच्या) कोशासारखा. जरा या पाखराची कारागिरी बघ रे माणसा! वाळलेला गिलका फोडला की आत तंतूंची दाट जाळी दिसते. गावच्या बायका भांडी घासायला ती जाळीच वापरत. खोप्याची वीणही तशीच दाट आणि एकसारखी असते. आणि हे सगळं तिने इवल्याशा चोचीने केलं. तीच तिचे दात आणि तीच तिचे ओठ. बहिणाबाई विचारतात, तुला रे देवाने दोन हात आणि दहा बोटं दिली आहेत ना? प्रश्न त्या आपल्यावर सोडतात: एवढीशी चोच हे करू शकते, तर आपले हात कशासाठी आहेत?