हरिपाठ
चित्त नाहीं नामीं
त्रिवेणी संगमीं नाना तीर्थें भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥१॥ नामासि विन्मुख तो नर पापिया । हरिविण धांवया नपवे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
एखादा माणूस त्रिवेणी संगमावर जातो, एका तीर्थाहून दुसऱ्या तीर्थाला भटकतो. पण त्याचे चित्त नामात नसेल, तर ते सारे व्यर्थ आहे. नामाकडे पाठ फिरवणारा माणूस पापी आहे. हरीवाचून संकटात धावून येणारा दुसरा कोणी नाही. वाल्मीकींनी हे सांगितले आहे, आणि पुराणांत ते प्रसिद्ध आहे: नामाने त्रैलोक्याचा उद्धार होतो. ज्ञानदेव आग्रहाने सांगतात, हरीच्या नामाचा जप करा. जो हा जप करतो, त्याचे कुळ पिढ्यानपिढ्या शुद्ध होते. त्रिवेणी संगम प्रयागला आहे. तेथे गंगा आणि यमुना यांना गुप्त सरस्वती येऊन मिळते. रामायण रचणारे वाल्मीकी जुन्या कथेनुसार आधी वाटमारे होते; रामनामाने ते ऋषी झाले.