हरिपाठ
साधुसंगती तरणोपाय
योग याग विधी येणें नव्हे सिद्धि । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव नकळे निःसंदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हीत कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ॥४॥
योग, यज्ञ आणि विधी यांनी सिद्धी मिळत नाही. ते सारे व्यर्थ ओझे आहे, दिखाव्यासाठी पाळलेला धर्म आहे. मनात भाव नसेल तर देव कळत नाही, यात काहीच संदेह नाही. आणि गुरूविना देवाचा अनुभव कसा कळणार? तपाविना देव लाभत नाही, आणि दिल्याविना काही प्राप्त होत नाही. जो तुला विश्वासात घेऊन गुज सांगतो, त्याच्यावाचून तुझे खरे हित कोण सांगणार? हे सारे दृष्टांत देऊन ज्ञानदेव सार सांगतात: जन्म-मरणाचा सागर तरून जाण्याचा उपाय म्हणजे साधूंची संगती. गीतेतही (४.३४) श्रीकृष्ण अर्जुनाला गुरूविषयी हेच सांगतात: “नमस्कार करून, प्रश्न विचारून आणि सेवा करून ते ज्ञान जाणून घे. ज्यांनी सत्य पाहिले आहे असे ज्ञानी तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.”