संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
मणी फिरवता युग सरले
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर। कर का मनका डारि दे, मन का मनका फेर॥
माळ फिरवता फिरवता, एकेक मणी ओढता ओढता अख्खे युग सरले; पण मनाचे फेरे काही थांबले नाहीत. हातातला मणी खाली ठेव, आणि मनाचा मणी फिरव. कबीरांच्या भाषेत माळेच्या मण्याला ‘मनका’ म्हणतात, आणि ‘मनका’ व ‘मन का’, म्हणजे मनाचा, ऐकायला जवळजवळ सारखेच. कबीर या शब्दखेळाचा पुरेपूर उपयोग करतात: फिरवायचा खरा मणी म्हणजे मनच.