संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
उकललेली अर्धी साखी
आधी साखी सिर खड़ी, जो निरूवारी जाय। क्या पंडित की पोथिया, जो राति दिवस मिलि गाय॥
साखी म्हणजे साक्ष देणारा दोहा. ती उकलून शेवटपर्यंत समजून घेतली, तर अर्धी साखीसुद्धा सर्वांत श्रेष्ठ ठरते. मग पंडितांच्या पोथ्यांचे काय? पंडित एकत्र बसून रात्रंदिवस त्या गात राहिले, तरी त्या पोथ्यांची किंमत ती किती? समजणे या अर्थी कबीर इथे ‘निरुवारणे’ हा शब्द वापरतात; त्याचा अर्थ उकलणे, गुंतलेल्या दोऱ्याचा गुंता हळूहळू सोडवावा तसे. रात्रंदिवस मोठ्याने गायलेल्या अख्ख्या पोथ्यांहूनही अशी उकललेली अर्धी साखी जड भरते.