संत कबीर · प्रेम आणि विरह
चातक आणि हरीण
साईं से लगन कठिन है, भाई। जैसे पपीहा प्यासा बूँद का, पिया पिया रट लाई। प्यासे प्राण तड़पे दिन राती, और नीर न भाए। जैसे मृगा शब्द-स्नेही, शब्द सुनन को जाई। शब्द सुने और प्राण दान दे, तनिक नहीं डराई। जैसे सती चढ़ी सत ऊपर, पिया की राह मन भाई। पावक देख डरे वह नाहीं, हँसत बैठे सरा माई। छोड़ो तन अपने की आशा, निर्भय हुए गुण गाई। कहत कबीर सुनो भाई साधो, नहीं तो जनम नसाई॥
भावा, स्वामीशी प्रेमाचे नाते जोडणे कठीण आहे. पपीहा, म्हणजे आपला चातक, पावसाच्या एका थेंबासाठी तहानलेला असतो. तो ‘पिया, पिया’ असा अखंड टाहो फोडतो; हिंदीत पिया म्हणजे प्रियकरही. तहानेने व्याकूळ झालेला त्याचा जीव रात्रंदिवस तडफडतो, तरी इतर कोणतेही पाणी त्याला रुचत नाही. हरणाला नादाचा असाच लळा असतो. पूर्वी शिकारी गाणे वाजवून हरणाला जवळ ओढून आणत, असे जुन्या काव्यांत येते. सूर ऐकायला हरीण त्याच्या दिशेने चालत जाते; सूर कानी पडतो, आणि ते जराही न घाबरता आपले प्राण देऊन टाकते. सतीचेही तसेच. पतीच्या चितेवर चढणारी ही पत्नी आपल्या व्रतावर ठाम असते. पती ज्या वाटेने गेला, तीच वाट तिला हवी असते. आग पाहून ती घाबरत नाही; हसत हसत चितेत जाऊन बसते. तिघेही आपल्याला प्रिय असलेल्या एकाच गोष्टीसाठी जिवावर उदार होतात. म्हणून देह सुखरूप राखायची आशा सोडा, निर्भय व्हा, आणि देवाचे गुण गा. नाहीतर, कबीर बजावतात, हा जन्म वाया जाईल.