मनाचे श्लोक
अभाग्याला दगड दिसतो
पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे। अभावें कदा पुण्य गांठीं पडेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
पुढे पाहिले तर सगळे भरून गेले आहे: जे जे दिसते, त्यात ते ठेवणेच भरून राहिले आहे. पण अभाग्याला समोरचे हे सगळे दगडच वाटते. भावाच्या अभावी त्याच्या गाठीला कधीच पुण्य पडत नाही; आणि समोरच असलेले ठेवणे त्याच्या मीपणाला आकळत नाही. श्लोकात दोन शब्दखेळ आहेत. त्याचा अभाव म्हणजे भावाचा, श्रद्धेचा, अभाव. आणि गाठ म्हणजे समर्थांच्या काळी लोक पैसे बांधून ठेवत ते वस्त्राचे टोक: पुण्य कधी तिथे येऊन पडत नाही.