मनाचे श्लोक
अहिल्या आणि बंदीतले देव
अहिले सतीलागिं आरण्यपंथें। कुढावा पुढें देव बंदीं तयातें। बळें सोडितां घाव घाली निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
दासाची कधी उपेक्षा होऊ न देणारा, प्रत्येक दासाला आपले मानणारा राम सती अहिल्येसाठी वनाच्या वाटेने गेला. पुढे तो बंदीत पडलेल्या देवांच्या मदतीला धावला. बळाने त्यांना सोडवून रामाने विजयाचा नगारा वाजवला. या श्लोकात जुने ध्रुपद परत येते, राम आणि त्याचे दास; कारण दोन्ही कथा रामाच्याच आहेत. सुप्रसिद्ध कथेप्रमाणे, पतीच्या शापाने शिळा झालेली अहिल्या, विश्वामित्रांबरोबर वनात जाणाऱ्या रामाच्या पायाचा स्पर्श होताच पुन्हा उठली. रामाने लंकेत रावणाला हरवले, तेव्हा बंदीतले देव मुक्त झाले.