मनाचे श्लोक
भवाच्या भयाने का भितोस?
भवाच्या भयें काय भीतोसि लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी । रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥
अरे भेकडा, भवाच्या भयाने, म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्याच्या भीतीने, तू का घाबरतोस? हे मना, धीर धर आणि धाक झुगारून दे. रघुनायकासारखा स्वामी तुझ्या डोक्यावर आहे. शिक्षेचा दंड हाती धरणारा यम जरी तुझ्यावर कोपला, तरी राम तुझी उपेक्षा कधीच करत नाही. समर्थ मनाची जराही गय करत नाहीत. ‘लंडी’ हा शब्द रांगडा, तुच्छतेचा आहे; श्लोकाइतकाच रोखठोक. राम आपल्या दासाची उपेक्षा कधीच करत नाही: हे वचन आता अकरा श्लोकांत येते: या श्लोकात आणि पुढच्या दहा श्लोकांत. पुढच्या श्लोकापासून ते प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ध्रुपद म्हणून येते.