मनाचे श्लोक
चंदनासारखे झिजावे
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ॥
देह सोडल्यावर मागे कीर्ती उरावी. हे सज्जन मना, असेच आचरण धरून ठेव. चंदनासारखे तू झिजत जावेस; आणि तरीही सज्जनांचे अंतःकरण निववावेस. ओल्या सहाणेवर चंदन उगाळून गंध करतात. ते पूजेत वापरतात, आणि थंडाव्यासाठी अंगालाही लावतात. प्रत्येक घासागणिक खोड झिजत जाते, आणि मागे उरतो तो थंडावा आणि सुगंध. दुसऱ्यांसाठी खर्ची पडलेले आयुष्यही असेच झिजते. मागे उरते ते समाधान, आणि देहानंतरही टिकणारे नाव.