मनाचे श्लोक
जाणत्याचे पाय धरावे
म्हणे दास सायास त्यांचे करावे। जनीं जाणता पाय त्यांचे धरावे। गुरूअंजनेंवीण ते आकळेना। जुनें ठेवणें मीपणें ते कळेना॥
दास म्हणतो: लोकांत जो जाणता आहे, त्याला शोधा. त्याच्या सेवेसाठी कष्ट घ्या, आणि त्याचे पाय धरा. गुरूने डोळ्यांत अंजन घातल्याशिवाय ते ठेवणे आकळत नाही. मीपणाला ते जुने ठेवणे कधीच कळत नाही. डोळ्यांत विशिष्ट अंजन घातले, तर जमिनीत पुरलेले धन कुठे आहे ते दिसते, अशी जुनी समजूत होती. गुरूचे अंजन म्हणजे त्याचा उपदेश; तो डोळे उघडतो, आणि आत्मा दिसू लागतो. एखाद्याचे पाय धरणे म्हणजे नम्रपणे त्याच्यापाशी जाणे, आणि ‘मला शिकवा’ अशी विनंती करणे.