मनाचे श्लोक
जसा भाव तसा देव
असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
ज्याच्या अंतरात जसा भाव असतो, तसाच देव त्याच्या अंतरात वसतो. जो फक्त त्याचाच झाला आहे, त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करतो. आपल्या लाडक्या दासांचा हात तो कधीच सोडत नाही. ‘जसा भाव तसा देव’ ही म्हण आपण आजही म्हणतो. हा ‘भाव’ श्लोक २६ मधल्या ‘भव’ या शब्दाहून वेगळा आहे; भव म्हणजे जन्म-मरणाचा फेरा. भाव म्हणजे देवाकडे पाहण्याची मनाची सगळी वृत्ती: प्रेम, विश्वास, किंवा नुसतीच कोरडी, अर्धवट श्रद्धा. श्लोकात ज्याचे रक्षण होते तो ‘अनन्य’, म्हणजे ज्याला दुसरे कोणी नाही असा भक्त; त्याचा विश्वास दुभंगलेला नसतो.