मनाचे श्लोक
महागडी साधने नकोत
बहूतांपरी संकटें साधनांचीं। व्रतें दान उद्यापनें तें धनाचीं। दिनाचा दयाळू मनीं आठवावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
साधनांच्या वाटेवर नाना प्रकारची संकटे असतात. व्रते, दाने, आणि व्रताच्या शेवटी करायची उद्यापने, या सगळ्यांना पैसा लागतो. पहाट फुटताना रामाचे चिंतन करावे, आणि दीनांवर दया करणाऱ्याला मनात आठवावे. व्रत म्हणजे, उदाहरणार्थ, काही काळ ठरावीक दिवशी उपवास करणे. त्याची सांगता उद्यापनाने होई: भोजन, आणि पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना दाने. एक व्रत पूर्ण करताना एखाद्या कुटुंबाचा मोठा खर्च होई. विधींना पैसा लागतो; दीनदयाळाला आठवायला मात्र फक्त मन लागते.