मनाचे श्लोक
न तपासलेले नाणे
अविद्यागुणें मानवा ऊमजेना। भ्रमें चूकलें हीत तें आकळेना। परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें। परी सत्य मिथ्या असें कोण जाणे॥
अविद्येमुळे, अज्ञानामुळे, माणसाला उमजत नाही. भ्रमाने तो भरकटला आहे; आपले स्वतःचे हित त्याला चुकले आहे, आणि ते त्याला आकळत नाही. न तपासताच त्याने एक नाणे वस्त्राच्या गाठीत घट्ट बांधून ठेवले आहे. पण ते खरे की खोटे, हे कोण सांगणार? खोट्याला खरे मानणारे अज्ञान, हा या श्लोकाचा आणि पुढच्या दोन श्लोकांचा विषय आहे. समर्थांच्या काळी बाजारात खोटी नाणीही हातोहात फिरत. म्हणून सावध माणूस नाणे घेण्याआधी दगडावर वाजवून पाहत असे. या श्लोकातला माणूस मात्र आपले हित समजून एक गोष्ट घट्ट धरून बसला आहे; ती त्याने एकदाही तपासून पाहिलेली नाही.