मनाचे श्लोक
पंडितांचे ब्रह्मराक्षस झाले
जनीं हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणें ब्रह्मराक्षस झाले। तयाहूंनि व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडूनि राहे॥
लोकांत मोठमोठे पंडित आपले खरे हित हातचे घालवून बसले. ‘मी’पणाच्या अहंकाराने ते ब्रह्मराक्षस झाले. आणि त्यांच्याहून व्युत्पन्न, म्हणजे विद्वान, असा कोण आहे? म्हणून हे मना, ‘मला कळते’ ही सगळी जाणीव सोडून दे, आणि तिच्यावाचून राहा. मरणानंतर भयंकर पिशाच्च झालेला विद्वान ब्राह्मण म्हणजे ब्रह्मराक्षस, अशी जुनी समजूत आहे. या माणसांची अशी दशा कशाने झाली, ते समर्थ सांगतात: अहंकाराने. इतके विद्वानही पडले, तर स्वतःला सुरक्षित समजावे इतका विद्वान कोणीच नाही. म्हणून समर्थ मनाला आपले जाणतेपणच पूर्णपणे सोडून द्यायला सांगतात.