मनाचे श्लोक
राग नको, लोभ नको
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी । नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ॥
क्रोधाने फक्त दुःखच वाट्याला येते: नको रे मना, क्रोध नको. कामवासना नाना विकार जागे करते: तीही नको. हे मना, लोभाला जवळ करू नकोस. हे मना, मत्सरही नको, आणि दंभाचे ओझेही नको. प्रत्येक ओळ ‘नको रे मना’ याच शब्दांनी सुरू होते. आगीकडे हात नेणाऱ्या मुलाला आई जशी ‘नको रे’ म्हणते, तसे हे शब्द आहेत. दंभ म्हणजे अंगी नसलेल्या चांगुलपणाचा देखावा.