मनाचे श्लोक
रामभक्ताला कामाची बाधा नाही
मुखीं राम त्या काम बाधूं शकेना। गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना। हरीभक्त तो शक्त कामास मारी। जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥
ज्याच्या मुखी राम आहे, त्याला काम, म्हणजे कामवासना, बाधू शकत नाही. नामामुळे त्याला हवे असलेले धैर्य कधी ढळत नाही. हरिभक्त कामाला मारण्याइतका समर्थ असतो. असाच भक्त म्हणजे ब्रह्मचारी मारुती; जगात तो धन्य आहे. मारुतीने आयुष्यभर ब्रह्मचर्याचे व्रत पाळले. समर्थांनी त्याला श्लोकाच्या शेवटी ठेवले आहे; ज्याने कामावर विजय मिळवला, अशा भक्ताचे तोच उदाहरण.