मनाचे श्लोक
विठ्ठलाच्या मस्तकी शंकर
विठोनें शिरीं वाहिला देवराणा। तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा। निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी। जिवां सोडवी राम हा अंतकाळीं॥
विठ्ठलाने देवांचा राजा शंकर आपल्या मस्तकावर धारण केला आहे. त्या शंकराच्या अंतरात रामाचाच ध्यास आहे; एवढेही तुम्ही जाणत नाही? तो चंद्रमौळी तपस्वी स्वतः निवाला; त्याचा दाह शांत झाला. हाच राम अंतकाळी जिवांना सोडवतो. परंपरा सांगते, की विठ्ठलाच्या मस्तकावरचा मुकुट म्हणजे शिवलिंग. म्हणून विठ्ठल शंकराला मस्तकी वाहतो, आणि शंकर रामाला अंतरात ठेवतो. रामाने शांत केलेला दाह म्हणजे शंकराने प्यायलेल्या विषाचा; त्याची कथा श्लोक ८२ मध्ये आली आहे.