मनाचे श्लोक
व्यर्थ चिंता कशाला?
मनीं मानवा वेर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊनि जातें । घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतिमंद तें खेद मानी वियोगें ॥
हे मानवा, तू मनात उगाच चिंता वाहतोस. जे व्हायचे, ते अचानक, आपोआप होऊन जाते. जे जे भोगायचे, ते सगळे कर्माच्या योगानेच वाट्याला येते. वियोग झाला म्हणून खेद करत बसतो, तो मतिमंद. वियोग म्हणजे जिवाभावाचे माणूस किंवा वस्तू दुरावणे: घरात झालेला मृत्यू, दूरच्या गावी गेलेला मुलगा, गमावलेली संपत्ती. चिंता केल्याने येणारे टळत नाही, आणि खेद केल्याने झालेले उलटत नाही.