निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
पक्षी अंतराळीं गेलां · दासबोध २०.१०.९
पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला । तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥
दासबोधाच्या या शेवटच्या समासात समर्थ ब्रह्म सर्वत्र कसे आहे, हे आकाशाच्या दाखल्यांनी सांगतात. बसलेले माणूस उठून गेले, तरी तिथे आकाशच राहते. प्राणी कुठेही पळाला तरी आकाश त्याच्याभोवती असते; जोर करून आकाशाबाहेर कसे जाणार? समर्थ म्हणतात, पक्षी उडून अंतराळात गेला, तरी त्याच्याभोवती आकाशच असते. तसे ब्रह्म प्रत्येक प्राण्याला व्यापून आहे. याच्या आधी समर्थ सांगतात, तीर्थे पाहायला दूर देशी कष्टत जावे लागते; परब्रह्मासाठी तसे जावे लागत नाही. ते जिथे बसलो, तिथेच आहे.