निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
पोहणें सिकला तो तरेल · दासबोध ९.७.३५-३६
पोहणें सिकला तो तरेल । पोहणें नेणें तो बुडेल । येथें हि अनुमान करील । ऐसा कवणु ॥ ३५ ॥ तैसें जयास ज्ञान जालें । ते ते तितुकेच तरले । ज्याचें बंधनचि तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥
जो पोहायला शिकला, तो नदी तरून जाईल. ज्याला पोहता येत नाही, तो बुडेल. यातही कोणी अंदाज करत बसेल का? ज्ञानाचेही तसेच. ज्यांना ज्ञान झाले, तेवढेच जन्ममरणाच्या फेऱ्यातून तरले. ज्याचे बंधनच तुटले, तोच मुक्त. समर्थ येथे श्रोत्यांच्या शंकेला उत्तर देतात. वाळलेले लाकूड पुन्हा हिरवे होत नाही, फुटलेले मडके पुन्हा जुळत नाही. तसा मेलेला माणूस पुन्हा जन्मत नाही; मग अज्ञानी आणि ज्ञानी सारखेच ठरले, अशी ती शंका. समर्थ म्हणतात, प्रयत्नाविना कार्य होत नाही, जेवल्याविना पोट भरत नाही, आणि ज्ञानाविना मुक्ती मिळत नाही.