निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
संसारत्याग न करितां · दासबोध ६.९.२४-२५
संसारत्याग न करितां । प्रपंचौपाधि न सांडितां । जनांमध्ये सार्थकता । विचारेंचि होय ॥ २४॥ हें प्रचीतीचें बोलणें । विवेकें प्रचीत बाणे । प्रचीत पाहतील ते शहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५॥
संसाराचा त्याग न करता, प्रपंचाच्या जबाबदाऱ्या न सोडता, लोकांमध्ये राहूनच जन्माचे सार्थक होते. ते होते केवळ विचाराने. हे नुसते तत्त्व नव्हे, प्रचीतीचे, अनुभवाचे बोलणे आहे, असे समर्थ सांगतात. विवेकाने ही प्रचीती मनात बाणते. जे ही प्रचीती स्वतः पाहतील, तेच शहाणे; अन्यथा नाही. साराचा शोध घेणाऱ्या या समासात त्याआधी ते सांगतात, परमात्मा या दृश्य जगाहून वेगळा आहे, आणि तरी त्याच्या आत, सर्व चराचरात भरलेला आहे. अंतरात विचार केला, की हा निश्चय मनात बसतो. पुढच्या ओवीत ते बाजारातली भाषा वापरतात: प्रचीती आणि अनुमान यांत रोख धन आणि उधारी इतके अंतर आहे.