निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
गुरुशिष्यां एकचि पद · दासबोध ७.२.२९-३१
गुरुशिष्यां एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद । परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९॥ देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती । एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३०॥ साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ३१॥
ब्रह्माच्या या समासात समर्थ सांगतात, ब्रह्मात उच्च नीच नाही. राजा आणि रंक, पुरुष आणि स्त्री, ब्राह्मण आणि शूद्र, सगळ्यांचे ब्रह्म एकच; तिथे कोणाचे सोवळे, कोणाचे ओवळे असा भेद नाही. समर्थ म्हणतात, गुरू आणि शिष्य दोघे शेवटी एकाच पदाला पोहोचतात; तिथे कसलाच भेद नसतो. पण त्यासाठी देहाशी जोडलेला संबंध, मी म्हणजे हा देह ही भावना, तोडलीच पाहिजे. देहबुद्धी संपली की सर्वांना एकच प्राप्ती होते. ब्रह्म एकच आहे, त्याला दुसरे नाही, असे श्रुतीचे, म्हणजे वेदांचे वचन आहे. साधू वेगवेगळे दिसतात, पण ते आपल्या खऱ्या स्वरूपात मिसळून गेलेले असतात. ते सगळे मिळून एकच झाले आहेत: देहापलीकडची ती वस्तू.