निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
एक म्हणती मराठें काये · दासबोध ७.१.३२-३४
एक म्हणती मराठें काये । हें तों भल्यानें ऐकों नये । तीं मूर्खें नेणती सोयें । अर्थान्वयांची ॥ ३२॥ लोहाची मांदूस केली । नाना रत्नेंच सांठविलीं । तीं अभाग्यानें त्यागिलीं । लोखंड म्हणोनि ॥ ३३॥ तैशी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत । नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥
या समासात समर्थ सांगतात की हा अद्वैताचा, अध्यात्मविद्येचा ग्रंथ आहे, आणि त्याचा अर्थ कोणाला गवसतो. तो सांगताना ते ग्रंथाच्या भाषेवर घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देतात. काही लोक म्हणतात, मराठी ते काय? भल्या माणसाने हे ऐकूच नये. समर्थ म्हणतात, अशी मूर्ख माणसे शब्दांतून अर्थ कसा उलगडतो, हे जाणत नाहीत. लोखंडाची पेटी केली आणि तिच्यात नाना रत्ने साठवली. पण एका अभाग्याने ‘हे तर लोखंड’ म्हणून ती टाकून दिली. तशीच ही भाषा प्राकृत, म्हणजे लोकांची बोलीभाषा आहे; पण तिचा अर्थ वेदांत आणि सिद्धांत आहे. भ्रमात पडलेले लोक हे न जाणता, आपल्या मंदबुद्धीमुळे तिचा त्याग करतात. पुढे समर्थ म्हणतात, सहज धन सापडले, तर ते घ्यावे; ते कशात ठेवले आहे, हे पाहत बसू नये. त्या काळी अध्यात्माचे ज्ञान संस्कृतातच शोभते, असा समज होता; त्याला हे उत्तर आहे.