निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
जंवरी चंदन झिजेना · दासबोध १२.२.१७-१८
जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥ १८ ॥
प्रत्ययाच्या या समासात समर्थ सांगतात की लोकांना खरे कळेपर्यंत भल्या माणसाला पुष्कळ सोसावे लागते. जो खरे बोलतो आणि खरे वागतो, त्याला लहानथोर मानतात; पण तोपर्यंत विवेकाने क्षमा करावी लागते. चंदन जोपर्यंत झिजत नाही, तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही. तोपर्यंत चंदन आणि इतर नाना झाडे सगळी सारखीच. तसेच, जोपर्यंत उत्तम गुण कळत नाहीत, तोपर्यंत लोकांना काय कळणार? उत्तम गुण दिसले की जगाचे अंतःकरण निवळते, म्हणजे लोकांची मने स्वच्छ होतात, असे समर्थ सांगतात. पुढे ते म्हणतात, अशी मने निवळत गेली की जगाशी सख्य जुळते.