निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
तुवां भोगिल्या पुनरावृत्ती · दासबोध ३.१०.५१-५३
तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥ कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं । तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥
वैराग्याच्या या समासात समर्थ विचारतात, मरणाच्या वेळी आई, वडील, भाऊ, बायको, मुले कुठे असतील? ही सारी केवळ सुखाची सोयरी, असे ते सांगतात. आणि ‘माझे माझे’ म्हणत राहिलास, तर रघुनाथाला अंतरशील, असा इशारा देतात. समर्थ म्हणतात, पुन्हा पुन्हा जन्म घेत तू किती आईबाप भोगलेस! बायका, मुली, मुलगे लाखोलाख झाले. कर्माच्या योगाने ते सारे एका ठिकाणी जन्माला आले, एकत्र आले. ते तू आपले कसे मानलेस, रे पढतमूर्खा? पढतमूर्ख म्हणजे खूप वाचूनही मूर्ख राहिलेला. तुझे शरीरसुद्धा तुझे नाही, मग इतरांचा विचार तो काय? आता एक खरा भगवंत, तो भावार्थाच्या, म्हणजे श्रद्धेच्या बळावर धरून ठेव.