तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १०२७: पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हें वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥२॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥ तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥
दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य, आणि दुसऱ्याला पीडा देणे हे पाप. या दोघांना दुसरी जोड नाही. सत्य हाच धर्म, आणि असत्य हेच बांधून टाकणारे कर्म. यापलीकडे दुसरे मर्म नाही. मुखाने नामाचे स्मरण हीच सद्गती, आणि देवाकडे पाठ फिरवणे हीच अधोगती, हे जाणा. संतांची संगत म्हणजेच स्वर्गात राहणे, आणि बेफिकीर, मोकाट जगणे हाच नरक. तुकाराम महाराज म्हणतात, हित कशात आणि घात कशात, हे उघड आहे. ज्याला जे योग्य वाटेल, ते त्याने करावे.