तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १३३५: बरें जालें देवा
बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥ बरें जालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ॥२॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥ बरें जालें तुझे केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥ तुका ह्मणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥
देवा, बरे झाले, माझे दिवाळे निघाले. या दुष्काळाने मला छळले, तेही बरेच झाले. त्या पश्चात्तापामुळे मन तुझ्या चिंतनात राहिले, आणि हा संसार ओकारीसारखा नकोसा झाला. देवा, बरे झाले, बायको कजाग मिळाली. लोकांमध्ये ही दुर्दशा झाली, तेही बरेच. जगात अपमान सोसावा लागला, धन गेले, गुरेढोरे गेली, तेही बरेच झाले. लोकलाज बाळगली नाही, हे बरे झाले; देवा, मी तुला शरण आलो, हे बरे झाले. तुझे देऊळ उभारले, आणि मुला-बायकोकडे दुर्लक्ष झाले, हे बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, एकादशीचे व्रत केले, उपवास करून रात्रभर जागरण केले, तेही बरे झाले. गाथेतल्या शीर्षकानुसार, संतांनी तुकोबांना विचारले, तुम्हाला वैराग्य कसे आले ते सांगा; त्याच्या उत्तरातल्या तीन अभंगांपैकी हा एक. त्या गटाच्या पहिल्या अभंगात तुकोबा आपली कहाणी सांगतात. आई-वडील गेले. दुष्काळात पैसा आटला, मान गेला, आणि एक पत्नी अन्न अन्न करत मेली. धंदा बुडाला. देवाचे देऊळ भंगले होते, ते त्यांनी मनात आले तसे उभारले, आणि एकादशीला कीर्तन सुरू केले.