तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १३५: बाळ बापा ह्मणे काका
बाळ बापा ह्मणे काका । तरी तो कां निपराध ॥१॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि ह्मणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥ तुका ह्मणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
लहान बाळ बापाला काका म्हणते, म्हणून ते काही दुष्ट ठरत नाही. भाव जसा असेल तसा, तो गोडच असतो. आणि विठ्ठल त्या भावाचे कोड पुरवतो. साखरेला कुणी धोंडा म्हटले, तरी तोंडाला तिची गोडी लागायची राहते का? तुकाराम महाराज म्हणतात, अडाणी माणसाचे बोल पोकळ नसतात, वरवरचे नसतात.