तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १५१०: काय वाणूं आतां न पुरे हे वाणी
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥ तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥४॥
संतांचे काय वर्णन करू? माझी वाणी पुरी पडत नाही. मी आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; तरी त्याने आपला मोठेपणा बाजूला ठेवला आहे. लोखंडाला कसे शिवू, असा विचार तो जाणतच नाही. संतांचे सामर्थ्य जगाच्या कल्याणासाठी असते; दुसऱ्यांवर उपकार करताना ते आपला देह कष्टवतात. सर्व जिवांवरची दया हेच संतांचे भांडवल; स्वतःच्या देहाची ममता त्यांना नसते. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्याच्या सुखात त्यांचे सुख असते, आणि त्यांच्या मुखातून अमृत पाझरत असते.