तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १७४१: लेंकराचें हित
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥ तुका ह्मणे माझें । तैसें तुह्मां संतां ओझें ॥३॥
लेकराचे हित आईचे मन सतत वाहत असते. कळवळ्याची जातच अशी: ती कोणताही लाभ न पाहता प्रेम करते. आई बाळाचा भार पोटात वाहते, आणि त्याला सगळ्याच गोष्टींत साहाय्य करते. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनो, तसे माझे ओझे तुमच्यावर आहे.