तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २२५४: जन्मा येउनि काय केलें
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥१॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली गांठोळीची नासी । पुढें भीक चि मागसी ॥२॥ तुका ह्मणे ठाया । जाई आपल्या आलिया ॥३॥
अरे, जन्माला येऊन तू काय केलेस? तू तर मुद्दलच गमावून बसलास. अरे फजितखोरा, अजूनही तरी तू माघारी का फिरत नाहीस? गाठीशी बांधलेली पुंजी तू उधळून टाकलीस; आता पुढे तुला भीकच मागावी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, जिथून आलास, त्या आपल्या ठिकाणी परत जा.