तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २६६: कन्या सासुर्यासि जाये
कन्या सासुर्यासि जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥३॥
सासरी निघालेली मुलगी पुन्हा पुन्हा मागे वळून माहेराकडे पाहते. केशवा, माझ्या जिवाची तशीच अवस्था झाली आहे. तू मला केव्हा भेटशील? आईपासून चुकलेले लहान मूल कावरेबावरे होऊन चहूकडे आईला शोधत राहते. पाण्यावेगळी केलेली मासोळी तडफडते. तुकाराम महाराज म्हणतात, तसाच हा तुका तुझ्यासाठी तळमळतो आहे.