तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २८०८: नको नको मना गुंतूं मायाजाळीं
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बां जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥ सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥ तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
मना, मायेच्या जाळ्यात गुंतू नकोस, नकोच. तुला गिळायला काळ जवळ येऊन ठेपला आहे. बाबा रे, काळाची झडप पडेल, तेव्हा आई-वडीलसुद्धा तुला सोडवणार नाहीत. राजा सोडवणार नाही, मुलखाचा चौधरी सोडवणार नाही, आणि बाकीचे मोठमोठे सोयरेही सोडवणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, एका चक्रपाणीवाचून, हातात चक्र धरणाऱ्या विष्णूवाचून, तुला कोणीही सोडवणार नाही.