तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २८२०: उंच निंच कांहीं नेणे हा भगवंत
उंच निंच कांहीं नेणे हा भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनियां ॥१॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥ चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥२॥ सजनकसाया विकूं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥ नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥४॥ नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥६॥ अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥७॥ गौळियांचे घरीं गाई अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥ यंकोबाचें ऋण फेडी हृषीकेशी । आंबऋषीचे सोडी गर्भवास ॥९॥ मिराबाईसाटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥ घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची । हुंडी महत्याची अंगें भरी ॥११॥ पुंडळिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका ह्मणे मात धन्य त्याची ॥१२॥
हा भगवंत उच्च काय, नीच काय, काहीच जाणत नाही. भक्ताचा भाव पाहून तो वाट पाहत थांबून राहतो. दासीपुत्र विदुराच्या घरच्या कण्या तो खातो. दैत्याच्या घरी तो प्रल्हादाचे रक्षण करतो. रोहिदासासोबत तो चामडे रंगवू लागतो, कबिराच्या मागावर शेले विणतो. सजन कसायासोबत मांस विकू लागतो, सावत्याचा मळा खुरपू लागतो. नरहरी सोनारासोबत दागिने घडवू लागतो, भाता फुंकू लागतो. चोखामेळ्यासोबत ढोरे ओढतो. नामदेवांच्या जनीसोबत शेणी वेचतो, धर्मराजाच्या घरी पाणी वाहतो, झाडलोट करतो. नामदेवांसोबत तो जेवतो, कसलाही संकोच धरत नाही. ज्ञानदेवांची भिंत तो स्वतः ओढतो. सारथी होऊन अर्जुनाचे घोडे हाकतो, सुदाम्याचे पोहे प्रेमाने खातो. गवळ्यांच्या घरी स्वतः गाई वळतो, बळीराजाच्या दारी द्वारपाल झाला. हा हृषीकेश यंकोबाचे कर्ज फेडतो, अंबरीषाचे गर्भवास सोडवतो. मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतो. दामाजीसाठी पाडेवार, म्हणजे महार, झाला. गोरा कुंभाराची माती वाहतो, मडकी घडवतो. मेहत्याची हुंडी स्वतः भरतो. पुंडलिकासाठी तो अजूनही तिष्ठत उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य त्याची कथा! यातले पुष्कळ संत कष्टाची कामे करणारे, वेगवेगळ्या जातींचे होते: कोणी चांभार, कोणी विणकर, कसाई, माळी, सोनार, कुंभार, कोणी महार, कोणी दासी. देवाने त्यांच्या कामात हात दिल्याच्या कथा संतांविषयी परंपरेत सांगितल्या जातात. मेहता म्हणजे गुजरातचे संत नरसी मेहता, आणि पुंडलिक म्हणजे तो आईवडिलांचा भक्त मुलगा, ज्याच्यासाठी विठ्ठल येऊन विटेवर उभा राहिला.