तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३०८४: जेथें कीर्तन करावें
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका ह्मणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
जिथे कीर्तन करायचे, तिथे अन्न खाऊ नये. कपाळाला बुक्का लावून घेऊ नये, आणि गळ्यात माळ घालून घेऊ नये. आपल्या तट्टासाठी किंवा बैलासाठी दाणा, किंवा गवतसुद्धा, मागू नये, हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनासाठी जे द्रव्य घेतात, आणि जे देतात, ते दोघेही नरकात जातात. कीर्तन म्हणजे संगीतासह देवाचे गुण गाणे, आणि त्यांचा अर्थ सांगणे. बुक्का ही काळी सुगंधी पूड; वारकरी ती कपाळाला लावतात. कीर्तनकाराचा मान करताना यजमान त्याला बुक्का लावतो, गळ्यात माळ घालतो, आणि जेवू घालतो. तुकोबांच्या दृष्टीने कीर्तन ही देवाची सेवा आहे; तिचा कोणताही मोबदला घेतला, की ती विकली जाते.