तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३२४: तुझें वर्म ठावें
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥ तुका ह्मणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥
देवा, तुझे वर्म मला ठाऊक झाले आहे; माझ्या भावाने ते मला हाती लागले. कासवी जशी करते, तसे तुझे रूप मी अंतरात धरून राहीन. तुझ्याशी माझी ताटातूट होऊ देणार नाही; तुझी माझी नजरभेट मी घडवतच राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे चिंतन हीच तुझी सेवा. वर्म म्हणजे मर्म, एखाद्याला आपलेसे करण्याची खरी खूण. कासवी पाण्यात राहूनही काठावरच्या आपल्या पिलांचे पोषण केवळ दृष्टीने, ध्यानाने करते, अशी जुनी समजूत आहे. तुकोबा तसेच, नुसत्या चिंतनाने, देवाला आपल्या अंतरात धरून ठेवतात.