तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३४७: जें कां रंजलें गांजलें
जें कां रंजलें गांजलें । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥३॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥ तुका ह्मणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥
जे दुःखाने पिचले आहेत, ज्यांना सगळ्यांनी गांजले आहे, त्यांना जो आपले म्हणतो, तोच खरा साधू ओळखावा. देव तिथेच आहे, असे जाणावे. लोणी आतून-बाहेरून मऊ असते; सज्जनाचे चित्तही तसेच असते. ज्याला सांभाळणारे कोणी नाही, त्याला तो हृदयाशी धरतो. आपल्या मुलावर जशी दया करावी, तशीच तो आपल्या दास-दासींवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, किती सांगू? तोच भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती आहे.