तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३७४६: आतां कोठे धांवे मन
आतां कोठे धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥ तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
देवा, तुझे चरण पाहिल्यावर आता माझे मन आणखी कुठे धावणार? थकवा गेला, शीण गेला; सगळा आनंदच आनंद झाला आहे. प्रेमाच्या रसात अशी मिठी बसली आहे, आणि मुखाला तुझी गोडी जबर लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला साजेसे असे मोठे आणि खरे माप म्हणजे विठ्ठल.