तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४०८२: अर्भकाचे साटीं
अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥ तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥३॥
लहान मुलासाठी पंतोजी स्वतः हातात पाटी धरतात. तसेच संत जगात स्वतः आचरण करून दाखवतात. लहान बाळाची चाल ओळखून आई आपले पाऊल तसेच टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, नाव लोकांसाठीच पाण्यात उभी असते.