तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४३१०: ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणती साधु ॥१॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥ तुका ह्मणे सांगी किती । जळो तयांची संगती ॥३॥
असे हे भोंदू कसे निपजले? वाईट कर्मे करतात, आणि स्वतःला साधू म्हणवतात. अंगाला राख फासतात, डोळे मिटून बसल्याचे दाखवतात, आणि पाप करतात. वैराग्याचे सोंग दाखवून ते विषयसुखाचा सोहळा भोगतात. तुकाराम महाराज म्हणतात, किती सांगू? जळो त्यांची संगत!