तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४६: विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुह्मी भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥ तुका ह्मणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
सारे जग विष्णूने भरलेले आहे, हे जाणणे हाच वैष्णवांचा धर्म. हा आपला, तो परका, असे भेदाभेद मानण्याचा भ्रम अमंगळ आहे. भागवत धर्म पाळणाऱ्या भक्तांनो, ऐका. जे हित कराल, ते खरेपणाने करा. कोणत्याही जिवाचा मत्सर तुमच्या हातून घडू नये. सर्वेश्वराच्या पूजेचे मर्म हेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण सगळे एकाच देहाचे अवयव आहोत. कोणत्याही अवयवाला सुख झाले किंवा दुःख झाले, तरी ते भोगतो तो एकच जीव. पायात काटा मोडला की डोळ्यांत पाणी येते, आणि हात लगेच तिकडे धावतो. देह एक असतो, म्हणून वेदना साऱ्या देहाची होते. सर्वांत एकच विष्णू आहे, हे पटले की दुसऱ्याचा मत्सर म्हणजे आपल्याच अंगाचा मत्सर ठरतो. मग प्रत्येक जिवाशी प्रेमाने वागणे हीच सर्वेश्वराची पूजा होते.