तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ५३३: कमोदिनी काय जाणे तो परिमळ
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥ तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
कमळिणीला आपल्या सुगंधाची काय कल्पना? तो सारा सुगंध भुंगाच भोगतो. देवा, तसेच तुझे नाम किती गोड आहे, हे तुला ठाऊक नाही. त्या नामाचे प्रेमसुख आम्हीच जाणतो. गाय गवत खाते, पण दुधाची गोडी तिच्या वासराला मिळते. जे ज्याच्या हातून निर्माण होते, ते त्याच्या कामी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोती शिंपल्याच्या पोटात तयार होतो, पण शिंपल्याची आणि त्याची भेटच होत नाही; त्याचा उपभोग दुसरेच घेतात.