तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ५४६: नाहीं सुख मज न लगे हा मान
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥ नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥ तुका ह्मणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥
मला यात सुख नाही; हा मान मला नको. पण हे लोक दूर राहत नाहीत; मी काय करू? देहाची सरबराई होते, तेव्हा माझे अंग पोळते. चांगले गोडधोड पक्वान्न मला विषासारखे वाटते. कोणी माझी स्तुती करू लागले, माझा मोठेपणा वर्णू लागले, की ते मला ऐकवत नाही; माझा जीव कासावीस होतो. देवा, मी तुझ्यापर्यंत पोहोचेन, अशी काही कळा मला सांग. या मृगजळात मला गुंतवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे हित कर. मी आगीत जळतो आहे; मला त्यातून बाहेर काढ.