तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ६११: विठ्ठल आमचें जीवन
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचे साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥ विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठलें ॥४॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
विठ्ठल आमचे जीवन आहे. सगळ्या वेदशास्त्रांचे स्थान तोच. सिद्धी मिळवण्याचे साधन विठ्ठल, आणि ध्यानाचा विसावाही विठ्ठलच. विठ्ठल आमच्या कुळाचे दैवत आहे. धन, नातीगोती आणि मनही तोच. पुण्य आणि पुरुषार्थ विठ्ठलच, आणि गोष्ट आवडते ती विठ्ठलाचीच. विठ्ठल सगळ्या जनांत पसरला आहे; सातही पाताळे त्याने भरली आहेत. तिन्ही भुवने त्याने व्यापली आहेत, आणि मुनींच्या मनातही तोच आहे. विठ्ठल जिवाचा जिव्हाळा, कृपेने कोवळा झालेला, प्रेमाचा पुतळा आहे. त्याने साऱ्या विश्वाला आपला छंद लावला आहे. विठ्ठल आमचा बाप, आई आणि चुलता आहे. बहीण आणि भाऊही तोच. विठ्ठलाशिवाय आम्हाला दुसऱ्या नात्यागोत्याची चाड नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता दुसरे काहीच नाही.