तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ७६५: नाहीं निर्मळ जीवन
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥ तैसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥ तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥
स्वच्छ पाणीच नसेल, तर साबण काय करणार? तसेच चित्त शुद्ध नसेल, तर तिथे उपदेश काय करणार? झाडाला फुले-फळे धरतच नसतील, तर वसंत ऋतू काय करणार? वांझ स्त्रीला मुले होत नसतील, तर नवरा काय करणार? पुरुष नपुंसक असेल, तर बायको त्याचे काय करणार? प्राण गेल्यावर शरीर कोणता व्यवहार करणार? तुकाराम महाराज म्हणतात, पाण्याशिवाय पीक येत नाही, येत नाही, हे जाणा.